पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळात दिसणार नव्या-जुन्यांचे मिश्रण

चंडीगढ  -पंजाबमधील मुख्यमंत्री बदलानंतर आता उद्या (रविवार) होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या रचनेविषयी उत्सुकता आहे. नव्या मंत्रिमंडळात नव्या-जुन्यांचे मिश्रण असण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत.

पंजाबमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपाला गेल्याने पक्षश्रेष्ठींनी नेतृत्वबदलाचे पाऊल उचलले. अमरिंदर यांना हटवून चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर चन्नी यांनी दोन वेळा दिल्ली दौरा केला. त्यांची शुक्रवारी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर कॉंग्रेस नेत्यांसमवेत बैठक झाली.

त्यामध्ये नवे मंत्रिमंडळ निश्‍चित झाल्याचे समजते. त्यानंतर चन्नी यांनी शनिवारी येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांकडे नव्या मंत्र्यांची यादी सादर करण्यात आली. पक्षाकडून किंवा सरकारच्या पातळीवरून नव्या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तर, आधीच्या अमरिंदर सरकारमधील पाच मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्‍यता आहे.

पंजाब मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 18 सदस्यांना स्थान मिळू शकते. चन्नी यांच्याबरोबरच सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सोनी या दोन उपमुख्यमंत्र्यांचा याआधीच शपथविधी झाला आहे. आता उर्वरित 15 मंत्र्यांचा शपथविधी होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.