प्योंगयांग – उत्तर कोरियाने या आठवड्याभरात चौथ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. लघु पल्ल्यांच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने घेतली आहे, अशी माहिती दक्षिण कोरियाने दिली आहे. उत्तर कोरियाच्या राजधानीच्या भागातून दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि समुद्रसपाटीपासून 30 ते 50 किलोमीटर उंचीवरून अंदाजे 350 ते 400 किलोमीटर दूरवर उत्तर कोरिया आणि जापन दरम्यानच्या समुद्रात कोसळली, असे दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेच्या लष्करी निरीक्षकांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा दक्षिण कोरिया आणि अन्य विरोधी देशांनी निषेध केला आहे. उत्तर कोरियाकडून आण्विक शस्त्रांच्या वापराला जे प्रोत्साहन दिले जात आहे, त्यामुळे उत्तर कोरियाच्याच जनतेचे नुकसान होणार आहे, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सूक येओल यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यदलांच्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेमुळे या नव्या क्षेपणास्त्रांच्या वापराला रोखले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उत्तर कोरियावर गेल्या 30 वर्षात आणल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांनतरही उत्तर कोरियाने आपल्या अणू कार्यक्रमाला आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला थांबवलेले नाही, असेही यून सूक येओल यांनी म्हटले आहे. मात्र ही क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे आपल्या सैन्य दलाच्या आधुनिकीकरणाच्या नियमित कार्यक्रमाचा एक भाग असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर आक्षेप घेतला जाणे म्हणजे त्यामध्ये विनाकारण हस्तक्षेप असल्याची टीकाही उत्तर कोरियाच्यावतीने करण्यात आली आहे.