पाषाण आणि लोहगाव भागात हवामान विभागाचे निरीक्षण केंद्र
पुणे – शहरात एखाद्याच ठिकाणी पाऊस पडतो, तर तेथून काही अंतरावर पूर्णपणे कोरडे वातावरण असते. एकाच शहरामधील वातावरणातील ही भिन्नता आश्चर्यकारक आहे. असे का होते? याचा अभ्यास आता भारतीय हवामान विभाग करत असून, स्थानिक स्तरावरील हवामानाचा पूर्वअंदाज देण्यासाठी पाषाण आणि लोहगाव या भागांचा अंदाज देण्याचा प्रयोग हवामान विभागाकडून केला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवामानाच्या अंदाजासंदर्भात विविध प्रयोग केले जात आहे. राष्ट्रीय स्तर ते प्रादेशिक आणि स्थानिक स्तरापर्यंतचा अंदाज अशी अनेक स्थित्यंतरे अनुभवत हवामान विभागाने आपल्या कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानात विविध बदल घडवले आहे. गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवरील हवामानातील बदल प्रकर्षाने जाणवत असल्यामुळ या बदलाचा बारकाईने करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विभागातर्फे पाषाण आणि लोहगाव येथे स्वतंत्र निरीक्षण केंद्रेदेखील उभारण्यात आली आहेत. तसेच स्थानिक हवामानाचा अंदाज नागरिकांना मिळावा, यासाठीच दि.27 नोव्हेंबरपासून लोहगाव आणि पाषाण येथील हवामानाचा अंदाज विभागातर्फे दिला जात आहे.
लोहगाव, शिवाजीनगर आणि पाषाण येथे तापमान, पावसाचे प्रमाण, आर्द्रता यासारख्या हवामानविषयक मापकांची नोंद केली जाते. या माहितीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात येतो. आतापर्यंतच्या नोंदींनुसार शिवाजीनगरपेक्षा पाषाणचे हवामान थंड, तर लोहगाव येथील हवामान उष्ण आहे. आगामी काळात हवामानाचा अंदाज पाच दिवस आधीच देण्याचा प्रयत्न आहे
– अनुपम कश्यपी, हवामानविभाग प्रमुख, आयएमडी.