पाचगणीत घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा

पाचगणी  – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाचगणी परिसरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. आठ आठ दिवस बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोज वाद होत आहेत.

एकीकडे शासन उज्ज्वला योजनेतून “घर तेथे गॅस कनेक्‍शन’ पुरवत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या तुटवड्याने ग्राहक “गॅस’वर असल्याचे चित्र आहे. पाचगणीतील गॅस वितरकांकडे 12 ते 13 हजार ग्राहक आहेत. दररोज 350 ते 400 सिलिंडरचे वितरण करावे लागते; परंतु मुंबईतील उरण येथील रिफायनरीतील आगीच्या दुर्घटनेमुळे केवळ 100 ते 150 सिलिंडर उपलब्ध होत असून प्रतीक्षा यादीप्रमाणे वितरण केले जात असल्याचे वितरकांनी सांगितले.

पाचगणीत गॅस कंपनीच्या गोडाऊनमध्येही सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. गॅस न मिळाल्यास वादवादी होत आहे. टंचाईने ग्राहक हैराण झाले आहेत. गृहिणींचे व्यवस्थापन कोलमडले आहे. प्रतीक्षा यादीत नाव नोंदवूनही सिलिंडर वाटपात वशिलेबाजी सुरू आहे. त्यामुळे वितरकांनी सिलिंडर वितरण पारदर्शकतेने करावे, अशी मागणी संतप्त ग्राहकांमधून होत आहे.

ओएनजीसीच्या उरणमधील प्रोसेसिंग प्लॅंटला 3 सप्टेंबरला भीषण आग लागली होती. तेव्हापासून प्रकल्पातील गॅस उत्पादन थंडावले आहे. तेथून वाई येथील प्रकल्पासाठी लिक्‍विड गॅस उपलब्ध होतो. वाईतील प्लॅंटमध्ये प्रोसेसिंग करून सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. उरण येथून लिक्‍विड गॅस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. थोड्याच दिवसात गॅस सिलिंडर पुरवठा पूर्ववत होईल.

– तानाजी भिलारे, व्यवस्थापक, भारत गॅस, पाचगणी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.