इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ तहसीलवर मोर्चा

टाळ मृदंगाच्या गजरात दिले निवेदन 

जामखेड – समाजप्रबोधनकार निवृत्त महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ व त्यांच्यावर गुन्हा दाखल करु नये या मागणीसाठी जामखेड येथील भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने वारकऱ्यांसह आज जामखेड तहसील कार्यालयावर टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला.

कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे इंदोरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ जामखेड येथील भक्ती शक्ती महोत्सवाच्या वतीने मंगळवारी (दि.18) दुपारी 12 वाजता जामखेड तहसील कार्यालयावर कार्यकर्ते व वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

या निवेदनात म्हटले आहे की, समाजप्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करु नये. कारण इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर व्यक्‍तिमत्त्व आहे. समाजातील काही समाजकंटक लोक त्यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाच्यावतीने तीव्र आंदोलन उभे केले जाईल.

यावेळी दिपक महाराज गायकवाड यांनी मोर्चादरम्यान बोलताना सांगितले की, धार्मिक ग्रंथ आणि गुरूचरित्राच्या आधारेच इंदुरीकर महाराज बोलत आहेत, इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात जे दाखले देत आहेत ते ग्रंथांच्या आधारेच देत आहेत. तृप्ती देसाई यांनी महाराजांना त्रास देण्याचे काम करु नये. देसाई या हिंदु धर्माला बदनाम करण्याचे काम करत आहेत.

तुम्ही चुकीच्या मार्गाने जाल तर वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही असा इशाराही देण्यात आला. नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले. सोमनाथ पोकळे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, दीपक महाराज गायकवाड, नगरसेवक अमित चिंतामणी, अभिमन्यू पवार, ऍड. प्रविण सानप, गोरख घनवट, आण्णा मांजरे, दत्तात्रय सोले, उत्कर्ष कुलकर्णी, ओंकार झेंडे, हरिदास गुंड यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.