हैदराबाद : सारखे मागे लागाणाऱ्या तरूणाला समज दिल्यानंतर त्याने एका 17 मुलीवर बलात्कार करून तिला पेटवून दिल्याची संताप जनक घटना तेलंगणामधील सुर्यापेठ गावात घडली.
या भीषण घटनेत ही मुलगी 50 टक्के भाजली. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थीर आहे, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे तेलंगणातील दिशा प्रकरणाची आठवण ताजी होत असून संतापाची लाट उसळली आहे.
या मुलीच्या कुटुंबियांनी या 21 वर्षीय तरूणाला तिला त्रास देऊ नकोस म्हणून समज दिली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तो त्यांच्या घरात घुसला. त्या तरूणीला त्याने खेचत शेजारच्या झुडपात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला पेटवून दिले.
ही घटना घडली त्यावेळी ती घरात एकटीच होती, तिच्या शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळावरून हा आरोपी फरार झाला. मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.