एक प्रेमकथा: धनंजय मुंडेसोबतच्या नात्याचा पुस्तकातून करणार उलगडा; दुसऱ्या पत्नीची फेसबुक पोस्ट चर्चेत

बीड : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, आता पुन्हा करुणा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता त्यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर संबंधात होतो असा खुलासा केला होता. एवढेच नाही तर या महिलेपासून आपल्याला दोन मुले असल्याचाही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून खुलासा केला होता.

करुणा धनंजय मुंडे, असे त्या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.

करुणा धनंजय मुंडे या नावाने फेसबुक अकाउंट असलेल्या पेज वरून त्यांच्यातील प्रेम कथेचे रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले गेले आहे. सोबतच एक फोटोही जोडण्यात आला आहे.

सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिले होते. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.