कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळाचा शिरकाव

  • शहर उत्तर, शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरने महास्वामींना तारले
  • पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांना मिळाले मताधिक्‍य 

सोलापूर: देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा कमळ फुलले. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे शरद बनसोडे यांनी कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा 1 लाख 51 हजार मताधिक्‍क्‍याने पराभव केला होता. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी सुशीलकुमारांचा तब्बल 1 लाख 58 हजार 608 मताधिक्‍क्‍याने पराभव करत भाजपचा गड राखला.

दिग्गजांच्या या लढाईत भाजपचे नवखे असलेले महास्वामींनी झेंडा फडकविला असला तरी यामागे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरली आहे. शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने सोलापुरातील कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यंदा लाट ओसरली असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत असतानाच महास्वामींनी भरघोस मतांनी सोलापूरची जागा कायम राखल्याने भाजपचा विश्वास आणखी दुणावला आहे. शिंदे यांच्या पराभवाला अपेक्षेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर कारणीभूत ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळाचा शिरकाव कॉंग्रेसजणांना थक्क करणारा आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रवेशानंतरच कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिंदे यांनी प्रयत्न करूनही ते आपला पराभव वाचवू शकले नाहीत. महास्वामी आणि शिंदे यांच्यात सरळ लढत झाली असती तर काहीसे वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, असे चर्चिले जात आहे. तरीसुद्धा महास्वामींमुळे भाजपचा विजय सोपा झाला हे मात्र नक्की समजावे लागेल.

भाजपने स्वतःच्या मतदारसंघात तर मताधिक्‍क्‍य दिलेच परंतु शहर उत्तर आणि अक्कलकोट या दोनसुद्धा मतदारसंघात घुसखोरी करत कमळाचा वरचष्मा राखण्यात यश मिळविले. त्यामुळे यंदा कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मते आणि वंचीत आघाडीच्या मतांची बेरीज केल्यास 5 लाख 36 हजार 384 होतात. जी मते महास्वामींना मिळालेल्या मतांपेक्षा 11 हजार 399 मते अधिक आहेत. मुस्लिम, दलित मते कॉंग्रेसच्या हक्काची असतानासुद्धा ती वंचितच्या पारड्यात गेल्याने शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सोलापूर लोकसभेसाठी उभारलेल्या 11 उमेदवारांना मिळालेली मते अगदी नगण्य असल्याने त्यांचा अन्य कोणत्याही उमेदवारावर प्रभाव दिसून आला नाही. एकूणच प्रकाश आंबेडकरांनी शिंदे यांना विजयापासून वंचित ठेवले म्हणावे लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)