सोनई, – नेवासा विधानसभेसाठी ८० टक्के विक्रमी मतदान झाल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे. गावागावांत मतदानाचा टक्का वाढल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. आ.शंकरराव गडाख यांचा बालेकिल्ला असलेल्या सोनई गटात विधानसभेला विक्रमी मतदान झाल्याने याचा फायदा कुणाला होणार आहे, हे शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्पष्ट होणार असल्याने सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.
या विधानसभेला मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले होते. त्यात महिलांचा व युवकांचा मोठा सहभाग दिसून आला. या आधी मतदानाची सरासरी 60 ते 65 टक्के पर्यंत असायची मात्र, या विधानसभेला मतदानाची टक्केवारी विक्रमी वाढल्याने सर्वाची धाकधूक वाढली आहे.नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे , प्रहारकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जोरदार टक्कर दिली. लंघे व मुरकुटे यांच्या मतदान विभागामुळे यात आ.शंकरराव गडाखच बाजी मारणार का, हे उद्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
सोनई आणि जवळील बारा वाड्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त मतदान झाले आहे शेवटच्या टप्प्यात मुरकुटे, लंघे यांनी राजकीय वातावरण टाइट केले होते. गडाख यांनी तिरंगी लढतीत सुरुवातीपासून ते मतदान होईपर्यंत मायक्रो नियोजन केले. प्रशांत गडाख यांची या निवडणुकीत उणीव संपूर्ण यंत्रणेला जाणवली असली तरी त्यांची उणीव भासणार नाही, याची खबरदारी सगळ्यांनीच घेतली.
दरम्यान, मतदानाचा टक्का वाढल्याने याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार आहे, हे निकालानंतर समजणार आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा कोणाला होणार आहे, हे 23 तारखेला निकालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे.
त्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याने अपक्ष किती मते घेतात, यावरच पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. नेवासा मतदार संघात तिरंगी लढतीत आमदार शंकरराव गडाखच विजयी होणार, अशी चर्चा कार्यकर्त्यात ठिकठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी तर पैजा लावण्यात आल्या आहेत.