जिल्हा पोलीस अधीक्षक; लोकसहभागातून बसवलेल्या साउंड सिस्टीमसह कॅमेऱ्यांचे उद्घाटन
कुडाळ (प्रतिनिधी) – सीसीटीव्ही कॅमेरा हा एक प्रकारे समाजाचा तिसरा डोळाच आहे. जे काही चांगले- वाईट घडते ते त्याद्वारे आपणास समजते, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसतो, कुडाळसारख्या छोट्याशा गावात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्याद्वारे गावातील प्रत्येक हालचालींवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. अशा विधायक उपक्रमासाठी गावातील गणेश मंडळांसह, ग्रामपंचायत व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत “सीसीटीव्ही’साठी लागणाऱ्या अंदाजे एक लाखांपर्यंतच्या खर्चासाठी लोकवर्गणी देऊन आगळावेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. भविष्याचा वेध घेणाऱ्या कुडाळ गावची भविष्यात हिवरे बाजार किंवा राळेगणसिद्धी या गावांसारखी ओळख निर्माण व्हावी, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.
कुडाळ येथील नव्याने बसविलेल्या साउंड सिस्टीमसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सातपुते म्हणाल्या, “गावात एकी असेल तर समाजहिताचे अनेक उपक्रम राबविता येतात, हे कुडाळ गावाने दाखवून दिले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा असलेली जिल्ह्यातील पहिली पोलिस चौकी म्हणून कुडाळचे नाव घेतले जात असून या उपक्रमामुळे गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल.’
कुडाळचा विस्तार होत आहे. दिवसेंदिवस रहदारीचे व वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे मुख्य चौकात व बाजारपेठेत वाहतुकीचा अडथळा व इतर घडामोडी घडल्या तर थेट पोलिस ठाण्यातून प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवली जाणार आहे. बाजारपेठेत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व चुकीच्या प्रकारांवर थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे. परिणामी गैरप्रकारांनाही यानिमित्ताने आळा बसण्यास मदत होणार आहे, असे जावळीचे सहायक पालीस निरीक्षक मीळकंठ राठोड यांनी सांगितले.
या यंत्रणेसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आदींचे सत्कार करण्यात आले. कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी आभार मानले. यावेळी पोलिस उपअधीक्षक अजित टिके, सरपंच विरेंद्र शिंदे, माजी उपसभापती रवींद्र परामणे यांच्यासह पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवती, ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनीही कार्यक्रमास सदिच्छा भेट
दिली.