पिंपरी- चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केले. त्यानंतर अजित पवार यांनी तोच धागा धरून महेश लांडगे यांना माझे नाव घ्यायला का वाईट वाटले, हे मला माहित नाही. मात्र, ज्याने चांगले काम केले आहे. त्याला चांगले म्हणायला शिका, असे म्हणत अजित पवार यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. त्यानंतर झालेल्या भाषणा दरम्यान महेश लांडगे यांनी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रयत्न केले, असे म्हणत त्यांचं अजित पवारांसमोर कौतुक केलं आणि हाच धागा धरून अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचा खरा विकास 2014 नंतर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच झाला आहे. महायुती सरकारच्या काळात पिंपरी-चिंचवडने प्रगतीपथावर झेप घेतल्याचा दावा महेश लांडगे यांनी केला. तसेच महेश लांडगे यांनी शिवनेरी जिल्हा तयार करण्याची मागणीही यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पिंपरी-चिंचवड प्रगतीपथावर आहे, असे उद्गार महेश लांडगेंच्या तोंडून निघताच अजित पवारांचा पारा चढला.
त्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत म्हणाले, महेश लांडगेंना माझं नाव घ्यायला काय वाईट वाटलं माहिती नाही, पिंपरी-चिंचवडचा विकास मीसुद्धा केला आहे. 1992 पासून माझ्या खासदारकीपासूनच या भागातील विकासकामांची सुरुवात झाली आहे. काम करणाऱ्यांना श्रेय द्या. कंजूसपणा करू नका. जिल्ह्यांचे विभाजन होणार, अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही. जिल्हा विभाजन करणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना चांगलंच सुनावलं.