कोरेगाव भीमा – पेट्रोलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना पेट्रोल 1 रुपया लिटरने मिळाल्यास, अशक्य वाटते ना? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद हा उपक्रम तुळापूरफाटा परिसरात राबवला.
नागरिकांनी या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला. या अनोख्या उपक्रमाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यामुळे सर्वात जास्त आनंद शेतकरी, कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना झाला.
कंद यांनी हा अभिनव उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी व नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी तसेच कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी कूपन बनवले होते. कूपन घेऊन जाणाऱ्या नागरिकास पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत होते. यामुळे नागरिकांची गैरसोय टळली.
1 रुपयात पेट्रोल मिळणार म्हटल्यावर पेरणे – वाडे बोल्हाई गणातील लोकांनी या उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला व आपल्या दुचाकी गाड्या घेऊन नागरिक प्रदीप कंद यांच्या तुळापूर फाटा कार्यालयासमोर गर्दी करताना दिसले. या कार्यक्रमास विविध पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मान्यवर उपस्थित होते.