स्थायीसाठी भाजपकडून संतोष लोंढे; राष्ट्रवादीने पंकज भालेकर यांना उतरविले मैदानात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपकडून संतोष लोंढे यांचा अर्ज सोमवारी (दि.2) दाखल करण्यात आला आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल केला आहे. मात्र, स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने संतोष लोंढे यांची निवड निश्चित मानली जात असून येत्या शुक्रवारी (दि.6) निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.
संतोष लोंढे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुवर्णा बुर्डे आणि अनुमोदक म्हणून राजेंद्र लांडगे यांची स्वाक्षरी आहे. यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, मावळते स्थायी समिती सभापती विलास मडेगेरी, माजी महापौर राहुल जाधव, भीमाबाई फुगे, नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून मयूर कलाटे, तर अनुमोदक म्हणून पौर्णिमा सोनावणे यांची स्वाक्षरी आहे. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रवीण भालेकर आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 असे एकूण 16 सदस्य आहेत. त्यात अपक्ष सदस्य भाजपसोबत असल्याने स्थायी समितीमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपचे लोंढे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
दरम्यान, मागीलवर्षी शितल शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी बंड केले होते. त्यावेळी अचानक विलास मडिगेरी यांना अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली होती. त्यावेळी शिंदे यांना पुढच्यावर्षी तुमचा विचार करु असे आश्वासन देत समजूत घालण्यात आली होती. यावर्षी ते प्रमुख दावेदार होते. मागीलवर्षी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता पक्षाने याही वर्षी
केली नाही. त्यामुळे स्थायीच्या अध्यक्षपदाला यंदाही शितल शिंदे यांना मुकावे लागले आहे.
नाराजी दूर करण्यासाठी स्थायीचे अध्यक्षपद
संतोष लोंढे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक मानले जातात. मात्र ओबीसी आरक्षण असूनही महापौरपदासाठी त्यांना दोन वेळा डावलेले गेले होते. नंतर स्थायी सभापतीपदासाठीही ते डावलले गेले. मात्र यंदा स्थायीचे सभापतीपद देऊन त्यांची नाराजी पक्षाने दूर केली आहे. तीन वर्ष चिंचवड विधानसभेकडे स्थायीचे अध्यक्षपद असल्याने यंदा भोसरी विधानसभेचा दावा प्रबळ मानला जात होता. त्यानुसार, भोसरीतील तीन सदस्यांपैकी नगरसेवक संतोष लोंढे यांना पक्षाने संधी दिली आहे.
पक्षाने मला चांगले काम करण्याची संधी दिली आहे. विकास कामांवर जास्तीत जास्त भर देणार आहे. पक्षाने तसेच पक्षश्रेष्ठीने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. आमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नाही. सर्वांचा मला पाठिंबा आहे.
– संतोष लोंढे, नगरसेवक