पुणे – राज्यात पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमातील रिक्तपदांसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांची व्यवस्थापननिहाय पात्र उमेदवारांची शिफारस, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना संबंधित संस्थांमध्ये उपस्थित राहून नियुुक्ती मिळविण्यासाठी येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील शाळांमधील रिक्तपदे मुलाखतीशिवाय भरण्याचा टप्पा सध्या राबविण्यात येत आहे. यांतर्गत आता उर्दू माध्यमासाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवारांच्या त्यांच्या लॉगिंवर निवड यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इयत्ता अकरावी व बारावी या गटातील ज्या उमेदवारांची द्वितीय श्रेणी अपडेट करणे आवश्यक होते. इयत्ता नववी ते दहावी या गटातील प्राधान्यक्रम न आलेला सर्व उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे.
ज्या उमेदवारांनी यापूर्वी शैक्षणिक पात्रतेमुळे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत, त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्यापूर्वी समांतर आरक्षण विषयक माहिती अपडेट करून घेणे गरजेचे आहे. नव्याने प्राधान्यक्रम भरणाऱ्या उमेदवारांना महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ या समांतर आरक्षणातील नोंद एकदाच करता येईल. ज्या उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नव्हती अशांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिलेल्या पसंतीक्रमानुसार दर्शविण्यात आलेले आहेत.
प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा
खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्तपदांसाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाही. त्यांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत. या उमेदवारांनी लॉगिन करून त्यांच्या समांतर आरक्षण विषयक माहिती भरावी व प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत. उमेदवारांना येत्या 1 ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये मुलाखतीशिवाय संस्थांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठीचे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.