पुणे विभागातील 50 जण क्वारन्टाईन
31 व्यक्ती पुणे विभागाच्या बाहेरील; 48 व्यक्ती अन्य राज्यांतील
पुणे – दिल्लीतील तबलिगी जमातीच्या समारंभात सहभागी झालेल्या 344 जणांची नवीन यादी प्रशासनाला मिळाली आहे. त्यातील पुणे विभागातील 50 जणांना क्वारन्टाईन केले आहे. 31 व्यक्ती पुणे विभागाच्या बाहेरचे असून राज्यातीलच आहेत. तर, 48 व्यक्ती अन्य राज्यांतील आहेत. तसेच 22 जणांची अद्याप माहिती मिळाली नसून, पोलीस प्रशासनाकडून त्याचे ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातील करोना सांसर्गिक एकूण रुग्ण संख्या 104 झाली असून पुणे जिल्ह्यात 74, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर जिन्ह्यात 2 रुग्ण आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 2 हजार 265 होते. त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 207 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 915 नमुने निगेटिव्ह आहेत व 104 नमुने पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत 19 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडले आहे.
तसेच, विभागामधील 8 हजार 615 प्रवाशांपैकी 3 हजार 977 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 4 हजार 638 प्रवाशांबाबत पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्याअंतर्गत 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 542 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भत केले आहे.