पुणे – आतापर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कारांमध्ये बालगंधर्व रंगमंदिरच्या या वास्तूत मिळालेला हा पुरस्कार मनाला खूप भावला. जीवनगौरव पुरस्कार्थींची कलाकार आणि रसिक यांच्या समवेत आयोजित केलेली भव्य मिरवणूक हे बहुधा पहिल्यांदाच घडले आणि हे सर्व अतिशय संस्मरणीय आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्य आणि सिने अभिनेत्री सविता मालपेकर यांनी भावना व्यक्त केल्या.
ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे एकदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रंगमंच पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात फाउंडेशनच्या कार्याची माहिती सांगितली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
कलाक्षेत्रातील विविध विभागांसाठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांना कलाभूषण पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार समारंभाआधी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरापासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत पुरस्कारार्थींची मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी सिंटाच्या संचालिका साहिला चढ्ढा, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब दाभेकर, नितीन साबळे, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, तृप्ती अक्कलवार, गोरक्ष धोत्रे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मोनिका जोशी आणि धनश्री कुलकर्णी यांनी केले. अश्विनी कुरपे यांनी आभार मानले.