नांदेड : घोडा बांधण्याची परवानगी मिळणेबाबत, अधिकाऱ्याच्या ‘त्या’ पत्राची सर्वत्र चर्चा

नांदेड – येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात घोडा उभा करण्याची मागणी करणारं एक पत्र सध्या तुफान व्हायरल होतंय. विशेष म्हणजे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्यानेच ही अजब मागणी केल्यानं चर्चेला जोर आला आहे. दरम्यान, यामागे आरोग्याचं कारण संबंधित अधिकाऱ्यानं दिलं आहे. याला जिल्हाधिकारी परवानगी देतील का ? हा विषय मोठ्या चवीनं नांदेडमध्ये चघळला जात आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागाचे सहायक लेखाधिकारी सतीष देशमुख यांनी बुधवारी (दि. 3 मार्च) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांना हे पत्र लिहलं आहे. “मला पाठीच्या कण्याचा त्रास होत आहे. त्यामुळे कार्यालयात येण्यासाठी दुचाकी वापरणं गैरसोयीचं ठरत आहे. त्यामुळं मी घोडा खरेदी करण्याचं ठरवलं असून घोड्यावर बसून कार्यालयीन वेळेत मला ऑफिसला येणं शक्‍य होईल,’ असं या पत्रात देशमुख यांनी नमूद केलं आहे.

आता कार्यालयात आल्यावर जसं वाहनतळ असतो, तसा घोडा उभा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल का, जिल्हाधिकारी आपल्या कार्यालयाच्या आवारात घोडा उभा करण्यासाठी परवानगी देतील का, असे प्रश्‍न उभे राहत आहेत.

दरम्यान, घोडा खरेदी करण्यामागे प्रकृतीचंच कारण आहे, की पेट्रोलचे भाव परवडत नसल्याने शासकीय अधिकाऱ्याने हे पाऊल उचललं आहे, अशीही चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, या अनोख्या मागणीची चर्चा जोरात सुरू असून, हे पत्रदेखील वेगानं व्हायरल होतंय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.