कोपर्डे हवेली -चाफळ, ता. पाटण येथे माजगावच्या शिवारानजीक गुरुवारी (दि. 25) सायंकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळला. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बिबट्या मरून 72 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आला. पंचनामा आणि इतर सोपस्कार झाल्यानंतर वनाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली अज्ञातस्थळी मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चाफळ-माजगाव डोंगरालगत वाघदरा नावाचे शिवार आहे. तेथे स्टोन क्रशरच्या रस्त्यालगत रमेश पाटील यांच्या मालकीच्या उसाच्या शेतात मृत बिबट्या आढळल्याची माहिती पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनरक्षक एम. पी. साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन खातरजमा केली. शेतामध्ये त्यांना बिबट्या सडलेल्या अवस्थेत आढळला. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनिल घाडगे यांनीही तेथे भेट दिली. सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तेथे पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर तेथे पहारा दिला.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी पशुधन विकास अधिकारी डॉ. सुचित्रा माळी, डॉ. अनिल घाडगे, वनाधिकारी सचिन डोंबाळे हे घटनास्थळी आले. बिबट्याच्या मृत्यूला 72 तास उलटून गेल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. या नर बिबट्याचे वय अंदाजे पाच वर्षे होते, असे सांगण्यात आले. शासकीय सोपस्कार झाल्यानंतर मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. मल्हारपेठचे वनपाल एस. बी. भाट, वनरक्षक आर. ए. गुरव, महादेव कदम, विक्रम गुजर, जालिंदर कोळेकर, अमृत साळुंखे उपस्थित होते. चाफळ परिसरात महिनाभर बिबट्याची दहशत होती, तरीही बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली.