सविंदणे (प्रतिनिधी) : सविंदणे (ता. शिरूर) येथे दोन दिवसापूर्वी एका बिबट्याने आई गोट फार्ममधील सानेन जातीच्या दहा बोकडांवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते व नऊ बोकडांना गंभीर जखमी केले होते. वन विभागाने याची तात्काळ दखल घेत सदर ठिकाणी पिंजरा लावला होता. पुन्हा एकदा बिबटया हल्ला करण्यासाठी आला असता अलगद पिंजऱ्यामध्ये अडकला.
शुक्रवारी रात्री संरक्षक भिंतीच्या शेजारच्या झाडावरून उडी मारुन बिबट्याने विनायक नरवडे यांच्या गोठ्यात प्रवेश करुन १० बोकडांचा फडशा पाडला होता. तसेच ९ बोकड गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात नरवडे याचे अंदाजे पंधरा लाखाचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर वनविभागावर चोहोबाजूंनी टिका झाली होती. वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावल्याने आज बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
हा बिबट्या अंदाजे दिड वर्ष वयोगटाचा आहे. या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात केली जाणार आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. दरम्यान या परिसरात अजुनही बिबटयाचे दिवसा दर्शन घडत आहे.याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करित आहे.