संगमनेर (प्रतिनिधी) leopard attack – तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात गुरुवारी मध्यरात्री आई-वडिलांसमवेत कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करत ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. ऊसतोड मजूर बिबट्यामागे पळाल्यामुळे या चिमुकल्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडविण्यात यश आले असले तरी या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
साखर कारखाने सुरू झाल्यामुळे आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ चाळीसगाव येथून आलेले संगमनेर साखर कारखान्याचे ऊस तोड मजुरांचे 20 कुटुंब राहत आहेत. गुरुवारी हे ऊसतोड मजूर आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असताना मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने ऊसतोड मजुराच्या कोपीत निर्धास्त झोपलेला चिमुकला वीरू अजय पवार (वय 3) याला जबड्यात घेऊन शंभर ते दीडशे फुटावर पलायन केले.
त्यामुळे चिमुकला जोरात ओरडल्यामुळे आई-वडिलांसह शेजारील ऊसतोड मजुरांनी या बिबट्याचा थरारक पाठलाग केला. त्याच्या जबड्यातून या चिमुकल्याची सुटका केली. या चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव होत असल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, चिमुकल्याची प्रकृती खालवत असल्याने पहाटे 4 वाजता त्याला नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. leopard attack
या घटनेची माहिती मिळताच माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच रुग्णालयात फोन करून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना बाबत सूचना केल्या.या चिमुकल्यावर सुरू असलेल्या उपचारासाठी या कुटुंबाला सर्वस्वी मदत करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यानंतर ऊसतोड मजुरांचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून त्यांना धीर देण्यात येत आहे. आश्वी परिसरात बिबट्याकडून ठिकठिकाणी शेतकर्यांच्या पशुधनासह नागरिकांवर हल्ले सुरू असल्याची माहिती विखे पाटील यांना देऊन वन विभागाकडून कोणत्याही आश्वासक उपाययोजना होत नसल्याचे सांगितले आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी यानिमित्ताने त्याच्याकडे केली आहे. leopard attack