बारामती : तीन दिवसांच्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी काल संध्याकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नेतेमंडळी व कार्यकर्ते येत आहेत. आज सकाळी देखील शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासी स्थानी मोठ्या प्रमाणावर इच्छुक व समर्थकांनी गर्दी केली होती.
शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांच्या जाहीर सभा अथवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने ते संबंधित जिल्ह्यातील राजकारणाची चाचपणी करत आहेत. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग सुरू आहे. अशातच संभाव्य उमेदवार आपण असावे यासाठी इच्छुकांची गर्दी शरद पवारांच्या पक्षाकडे वाढली आहे.
काल संध्याकाळी देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार शरद पवार यांना भेटले त्यानंतर इंदापूर तालुक्यातून आप्पासाहेब जगदाळे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी देखील त्यांचे समर्थक शरद पवारांना भेटले. आज सकाळ पासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी भेटत आहेत. यामध्ये माण खटाव मतदार संघातील तसेच अनिल देसाई यांच्या समर्थकांनी देखील भेट घेतली.