चाकूच्या धाकाने धमकावत महिलेची दुचाकी पळवली

भरसकाळी शाहूपुरी येथे घडली घटना

सातारा – कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळविल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शाहूपुरी परिसरात घडली. विणा उपचंद बाफना (वय 45, रा. रत्नमणी सोसायटी, शाहूपुरी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरीतील रत्नमणी सोसायटीमध्ये राहणाऱ्या विणा उपचंद बाफना (वय 45) या बुधवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच 11 बीक्‍यू 7749) राजवाड्याकडे येत होत्या. यावेळी पिवळा टी शर्ट परिधान केलेल्या एका युवकाने त्यांची दुचाकी अडवली.
बोलण्याचा बहाणा करून त्याने काही क्षणातच खिशातील चाकू बाहेर काढला. त्यांना धमकावत दुचाकी घेऊन त्याने पलायन केले. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या बाफना या त्याच रस्त्याने माघारी घरी पळत गेल्या. यानंतर त्यांनी याची माहिती घरातील लोकांना दिली.

शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली असून, शहर व परिसरात चोरट्याचा शोध घेतला जात आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.