भोपाळ : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा राजीमामा राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सोपवण्यापूर्वी कमलनाथ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या एका वार्ताहराला कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पत्रकार परिषदेला अनेक आमदार आणि दिल्लीहून या राजकीय घडामोडीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते. सरकारच्या माहिती जनसंपर्क विभागातील अनेक अधिकारीही उपस्थित होते. या पत्रकाराची कन्या ही अलीकडेच लंडनहून दिल्ली मार्गे आली होती. तिच्यासोबत दिल्लीहून भोपाळला शताब्दी एक्सप्रेसने आलेल्या तिच्या भावाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. इंदूरमध्ये पाच जण बाधीत आढळल्याने तेथे संचारबंदी लादण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात एकूण नऊ जणांना बाधा झाली आहे. दरम्यान या पत्रकाराला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समजताच कमलनाथ यांनी स्वत:ला क्वारंटाईन करण्याचे ठरवले आहे. त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन होण्याचे आवाहन सरकारने केले आहे.