पुणे – परीक्षा सुरू असताना केंद्रावर अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी जॅमर बसविताना केंद्र सरकारच्या धोरणाचे कठोरपणे पालन करा, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयांना दिले आहेत.
परीक्षा आयोजित करणाऱ्या वैधानिक संस्थांना रेडिओ आधारित उपकरणांच्या सहाय्याने अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कमी शक्तीचे जॅमर परीक्षा केंद्रांवर बसविण्याची मुभा केंद्र सरकारने 2016 साली दिली आहे. यासंदर्भात यूजीसीने कुलगुरू आणि प्राचार्यांना पत्र पाठविले आहे. त्यात संबंधित आदेशाबाबत अनिवार्यपणे ठोस पावले उचलण्याची खात्री करून घ्यावी. जॅमर बसविण्यापूर्वी सचिव (सुरक्षा) यांच्याकडून परवानगी घेणे गरजेचे असते. शासकीय कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या दोन्ही कंपन्या परीक्षा केंद्रांवर कमी ताकदीचे जॅमर भाड्याने देण्यासाठी कटिबद्ध आहे.
परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थांच्या मागणीवरून जॅमर उपलब्ध करून देण्याची जबाबदारीसुद्धा या दोन्ही कंपन्यांचीच आहे. जॅमर बसविणाऱ्या कंपन्यांकडून खुली निविदा मागवण्याची पद्धत अस्तित्वात नाही. असे केल्यास ते नियमाचे उल्लंघन मानले जाते. या सर्व पार्श्वभूमीवरया धोरणाबाबत निर्देश “यूजीसी’ने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना दिले आहेत. परीक्षा केंद्रावर “ईसी-सीआरजे-6बी 5′ हेच जॅमर वापरण्याचे “यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.