एक बदनाम परंतु औषधी वृक्ष-मोह

सुजाता टिकेकर 

मोह हे झाड आदिवासी भागातले, रानावनातले. आदिवासींचे कमाईचे साधनच जणू. आदिवासी भागातील जनतेला भातशेती व्यवसायाचा हंगाम थंडावल्यानंतर ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांना आधार मिळतो तो जंगलाचा. उदरनिर्वाहाबरोबरच रोजगार मिळण्यास मोहाची झाडे त्यांना हात देतात. वनातील “मोह’ हे झाड आदिवासींना मोठे वरदान ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोह किंवा मधुका हा शुष्कपर्णीय वृक्ष उष्ण कटिबंध हवामानात आढळतो. मोहाच्या झाडाची फुले, फळे, लाकडे उपयुक्त असतात.

मोहाच्या झाडाला महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोहवा, मोहव्रा, मोहा या नावाने ओळखतात. मोहाच्या झाडाचे आयुर्मान साधारणपणे 80ते 100 वर्षाहून अधिक काळ आहे. हे झाड आंब्यासारखे दिसते. सर्वसाधारणपणे याचे लाकूड काळे असते. झाडाची तोड करण्यासाठी दररोजच्या वापरातील लागणारी हत्यारे चालतात; परंतु वाळल्यानंतर या लाकडावर करवत,कुऱ्हाड, कोयता सहज चालत नाही. त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.

या झाडाला दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुले येऊ लागतात. फांद्यांच्या टोकावर फुलांचे घोस येतात. ज्यावेळी झाडास नवीन पालवी फुटते त्यावेळी फुलांचे दलपुंज गळून पडत असतात. साधारण 10 व्या वर्षापासून झाडांना फुले येतात ती वयाच्या 60 व्या वर्षापर्यत.

एप्रिल महिन्यात फळे येण्यास सुरूवात होत असते. मे ते जुलै या कालावधीत फळे परिपक्व होऊन गळून पडतात. या फळाला ग्रामीण भागात “दोडा’ म्हणून संबोधले जाते. ही फळे परिपक्व झाल्यानंतर माणसे, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, माकडे, पोपट खातात. या फळातील बिया गोळा करण्यासाठी लोक भल्या सकाळी जातात.ह्या बिया गोळा करणे हे तर एक उदरनिर्वाहाचे साधन आहे.

मोहाच्या फुलांचे आरोग्याला आणि इतर उपयोग…

मोह हे अत्यंत उपयुक्त झाड आहे. या झाडाची साल, पाने, फुले आणि बिया असे सर्वच भाग औषधी म्हणून वापरली जातात. सालीचा काढा खरुज, हिरड्‌यांमधून रक्त येणे आणि क्षत बरे करण्यासाठी लवले जाते. मधुमेहात ते सेवन करण्यात येते.
पाने तुरट, जखम भरुन काढणारी आहेत. त्यांची लोणी (तूप) मिश्रित राख भाजण्यावर आणि जखमांवर लावण्यात येते.
फुले कफावर व श्‍वसननलिका सुजण्यावर वापरतात, ती थंड आणि पोषक आहेत. फुलापासून तयार कलेले स्पिरिट शक्तिवर्धक व पोषक समजण्यात येते. फुले काही प्रकारच्या जीवाणू विरोधी गुणधर्मांनी युक्त असल्याचे समजण्यात येते.
मोहाची फुले कच्ची किंवा शिजवून खाण्यात येतात. त्यांचा जास्त वापर केल्यास दुष्परिणाम होतात. अल्कोहोल, सिकरा, सरबते, मुरंबा वगैरे तयार करण्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
साबण तयार करण्यात, स्वयंपाक वगैरेत मोहाचे तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मोहाची पेंड खत म्हणून वापरण्यात येते. कधी कधी ती पाळीव जनावरांना खाऊ घालतात.

या प्रजातीची मधुकालॉंगिफोलिया जुने नाव बॅसिया लॉंगिफोलिया ही जाती भारतीय द्वीपकल्पात सापडते आणि मधुका इंडिका याच स्थानिक नावाने ओळखली जाते. झाडाच्या संपूर्ण अवयवांचे गुणधर्मसुद्धा मधुका इंडिकासारखेच आहेत. दोन्ही झाडांची औषधे आणि उत्पादने खात्रीलायक म्हणून नोंदविली गेली आहेत.

 • दारु ही आपल्या आरोग्याला कितीही घातक असली तरी ह्या मोहाच्या फुलांपासून दारु बनवतात हे खरं आहे. हे मद्यार्क काही औषधांमधे वापरतात.या मद्यार्काचा इंधन म्हणून वापर करण्यावर संशोधन चालू आहे.
 • टॅनिन, कातडी कमावणे तसेच जखमा लवकर भरून येण्यासाठी या झाडाच्या सालीचा उपयोग केला जातो.
 • पांढऱ्या रंगाची फुले खाण्यास उपयोगी असतात. जनावरे व लहान मुले ती चवीने खातात.
 • मोहाच्या फुलात साखर, व्हिटॅमिन व कॅल्शिअम खूप असते. ही फुले भातात शिजवून तो भात मिष्टान्न म्हणून खाण्याची प्रथा आहे .*मोहाच्या बिया घाण्यामध्ये टाकून तेल काढले जाते. एका झाडापासून साधारणपणे 2 डबे (30 कि.ग्रॅ) तेल निघते. आदिवासी भागातील बहुतेक लोक या तेलाचा वापर खाण्यासाठी करतात. या तेलामुळे हृदयाला बळकटी येते.
 • चरबीयुक्त तेलापासून साबण तयार करण्यात येतो. धुण्याचा साबण तयार करण्यासाठीही हे तेल वापरले जाते.
 • वंगण, मेणबत्ती ग्रीससाठी तेल वापरले जाते.
 • तसेच हे तेल फेफरे, त्वचेचे रोग, डोकेदुखी, मूळव्याधीसाठी उपयोगी आहे.
 • ही पेंड जाळून घराभोवती धूर केला तर कृमी-कीटक साप निघून जातात.
 • सर्प दंशावरील उपचारासाठीही याचा वापर होतो.
 • काही आदिवासी लोक मासे मारण्यासाठी पेंडीचा उपयोग करतात.
 • तसेच फळे, फळभाज्या कडधान्ये व डाळी यावर पडणाऱ्या बुरशीसाठी रक्षक म्हणून चांगला उपयोग होतो.
  असा बहुविध उपयोग असलेला “मोह’ याला मधुका म्हणतात हे त्याच्यातील बहुविध गुणांमुळेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)