टोकियो – करोनाच्या धोक्यामुळे एका वर्षांने लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या खर्चात 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संयोजन समितीने ऑलिम्पिकचा खर्च जाहीर करतानाच स्पर्धेसाठीचे नवे अंदाजपत्रक जाहीर केले. भारतीय रुपयांत ढोबळ मानाने सांगायचे तर हा खर्च जवळपास 1200 अब्ज इतका प्रचंड आहे.
ऑलिम्पिकचा खर्च 15.4 अब्ज अमेरिकन डॉलर इतका झाला आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा झाली असतील तर 12.6 अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च आला असता. ऑलिम्पिक स्पर्धा करोनामुळे एका वर्षांने पुढे ढकलण्यात आल्यामुळे 2.8 अब्ज अमेरिकन डॉलरचा अतिरिक्त खर्च आयोजकांना सहन करावा लागणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकला 23 जुलै 2021 रोजी तर पॅरालिम्पिक स्पर्धेला 24 ऑगस्टपासून सुरुवात होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) 2013 मध्ये संयोजनपदाचे हक्क दिले त्यावेळी टोकियो ऑलिम्पिकसाठी 7.5 अब्ज डॉलर इतका खर्च अपेक्षित होता. पण त्यात आता पुन्हा वाढ झाली आहे.