Suvendu Adhikari : आजचा(९ मे) हा दिवस ऐतिहासाहिक ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी शपथ घेणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यानंतर आज पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथील ब्रिगेड परेड ग्राउंड या ठिकाणी सकाळी ११ वाजता सुवेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल मुख्यमंत्री पदाची शपथ देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे काही आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून, देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि भाजपचे अनेक बडे नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे या शपथविधी कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी समारंभाला हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. सुनेत्रा पवार कालच कोलकत्ता विमानतळावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार होते. या नेत्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोलकत्ता विमानतळावर करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड दिल्यानंतर भारतीय जनता पक्ष निर्विवादपणे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न याशिवाय राज्यात महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री असतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी रुपा गांगुली यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री उत्तर बंगालमधील एक पुरुष प्रतिनिधी असतील. सुवेंदू अधिकारी यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कार्यभार देण्यात येणार आहे. कोण आहेत सुवेंदू अधिकारी? सुवेंदू अधिकारी हे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक होते. ते भाजपात गेल्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक बनले. त्यांनी भवानीपूरमध्ये मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. तसेच नंदीग्राममधूनही सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. याच मतदारसंघातून त्यांनी २०२१ मध्ये ममता यांचाच पराभव केला होता. हेही वाचा : Thalapathy Vijay Political Journey: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! ‘थलापती’ विजय यांचा २७ महिन्यांचा राजकीय प्रवास ठरला ऐतिहासिक