उंबरे दंगलीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

राहुरी – उंबरे येथील कालच्या (गुरुवार) दंगलीचा विषय आज (शुक्रवार) विधान परिषदेत गाजला. आ. प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. सभापती नीलम गोरे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत उच्चस्तरीय विशेष अधिकाऱ्यामार्फत या दंगलीचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उंबरे येथील दंगलीची उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचे वृत्त दैनिक प्रभातने आजच प्रकाशित केले आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत आ. लाड यांनी मुंबईत सांगितले की, राहुरी तालुक्यातील उंबरे गावामध्ये एक मुस्लिम शिक्षिका खासगी क्लास चालवते.तिच्या क्लासमधे 8 ते 10 हिंदू मुली शिकवणीसाठी जातात. त्या मुलींना मुस्लिम धर्मातील शिकवणूक दिली गेली. नमाज पठण व अन्य सण साजरे करण्यासाठी प्रेरित केले गेले. या मुलींचे फोटो काढून ते मार्फिंग केले गेले. त्या आधारे ब्लॅकमेल केले गेले. मुस्लिम मुलांबरोबर विवाह केला नाही किंवा पळून गेला नाहीत तर फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली गेली. काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या. एका अल्पवयीन मुलीने पालकाकडे तक्रार केली. याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. साई मंगल कार्यालयात याबाबत हिंदू समाजाची बैठक झाली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मौलवींना जाब विचारला असता प्रार्थना स्थळावर हल्ला केल्याची फिर्याद दिली गेली.
स्थानिक पोलिस व जिल्हा अधीक्षकां पोलिसांनी मुस्लिम समाजाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली. पीडित कुटुंबाला धीर देण्यासाठी गेलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी आरोपी करून जबर मारहाण केली. त्यांच्यावरच दरोडा, दंगलीचे गुन्हे दाखल केले.
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मुस्लिम शिक्षिका व मुले यांच्यावर लव्ह जिहादप्रकरणी गुन्हे दाखल करावेत. विधान परिषदेत आ. लाड यांनी भूमिका मांडताना ही मागणी केली.
उंबरे गावात घडलेल्या घटनेसंदर्भात राज्यस्तरीय पोलीस महानिरीक्षकांना चौकशी करण्याचे सभापतींनी आदेश दिले आहेत.आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत घडलेल्या घटनेची सखोल चौकशी होणार आहे.
दरम्यान, पीडित कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी गेलेल्या हिंदू मुलांवर दंगल, दरोडा असे गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलिसांचा निषेध करणारे स्टेटस सोशल मीडियावर आज अनेकांनी ठेवले आहेत.





