पुणे – महा जनहित प्रतिष्ठानतर्फे एसटी कामगारांना गव्हाची पोती मदत म्हणून देण्यात आलेली आहेत. तसेच शासनाने एसटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणीही प्रतिष्ठानकडून करण्यात आलेली आहे.
एसटी कामगारांचा विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरु आहे. काही कामगारांनी आत्महत्याही केल्या आहेत. कामगारांनीही दोन पावले मागे घ्यावीत व राज्य शासनानेही कामगारांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून प्रश्न सोडवावेत. कामगारांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आत्महत्या करु नयेत, असे आवाहन महा जनहित प्रतिष्ठानचे संस्थापक हेमंत ढमढेरे यांनी केले आहे. ढमढेरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्वारगेट येथे आंदोलकांची भेट घेतली व कामगारांना मदतीचा हात दिला आहे.
यावेळी हेमंत ढमढेरे यांच्यासह अशोक राऊत, पायल राऊत, अर्चना कणसे, वंदना जाधव आदी उपस्थित होते. कामगारांच्या वतीने राजेंद्र मेश्राम, निलेश पोटफोडे, धनंजय डेंगळे, मीरा राजपूत, अनिता सपकाळ यांनी आभार मानले.