पावसाची जोरदार हजेरी

पवना धरण पन्नास टक्के भरले

पिंपरी – गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहरवासियांना आज चांगलेच झोडपून काढत जोरदार हजेरी लावली. आज शहरासह मावळ तालुक्‍यात व पवना धरणक्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने पवना धरण सायंकाळपर्यंत पन्नास टक्के भरले आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात शहरात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली, असे वाटत असताना पावसाने दडी मारली.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शहरात कडक ऊन पडू लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. गत वर्षीच्या तुलनते निम्माही पाऊस न झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न ही गंभीर बनण्याची शक्‍यता होती. सध्या शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने त्यामध्येही आणखी कपात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने बरसण्यास सुरुवात केली.

पहाटे हजेरी लावल्यानंतर जराशी उसंत घेत पावसाने दुपारी एकच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सर्वत्र पाणी वाहत होते. तर पवना नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. सायंकाळी सहानंतर पावसाने परत एकदा जोर धरला. रात्री 9 वाजेपर्यंत पावसाने उघडीप दिली नव्हती. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे तसेच जोराच्या पावसामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली. शहरातील बहुतांश रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय होत असली तरी सर्वांनीच या पावसाचे मनापासून स्वागत केले. पाऊस पुढील काही दिवस असाच कायम राहिला पाहिजे, अशी भावनाही अनेकांनी व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.