नगर : आनंदधाम फाउंडेशनतर्फे 10 रुपयांत सकस भोजन

नगर (प्रतिनिधी) -राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या विचारांवर कार्यरत असलेल्या आनंदधाम फाउंडेशनने लॉकडाऊन काळात गरजूंपर्यंत रोज दोन वेळचे अन्न पोहचविण्याची व्यवस्था उत्स्फूर्तपणे सुरु केली. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपेपर्यंत फाउंडेशनने तब्बल 59 हजार जेवणाची पाकिटे गरजूंपर्यंत पोहचविली. आता 1 जूनपासून फाउंडेशनने अन्नसेवा नाममात्र 10 रुपये शुल्क आकारुन आनंदधाम येथे चालू ठेवणार आहे. याठिकाणी येवून पोटभर सकस जेवणाचे पार्सल घेवू शकतील. सोमवारपासुन सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत ही अन्नसेवा सुरु राहणार असल्याची माहिती फाउंडेशनवतीने देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या टप्प्यातील लॉकडाऊन खूप कडक असल्याने हातावर पोट असलेल्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा सर्वांच्या भुकेचा विचार करुन आनंदधाम फाउंडेशनने सुमारे पाचशे जेवण पाकिटांपासून उपक्रमास सुरुवात केली. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व साधूसाध्वीजींच्या आशिर्वादाने या सेवेला प्रारंभ झाला.

जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या रितसर परवानगीने ही मानवसेवा सुरु झाली. मर्चंटस् बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, अध्यक्ष आनंदराम मुनोत व सर्व संचालक, केशरगुुलाब ट्रस्टचे किशोर मुनोत, शामलाताई मुनोत, चंद्रभान अग्रवाल, के.के.खान, संजय कासलीवाल, प्रफुल्ल कोठारी, महावीर गांधी, आनंद बोगावत, भाऊ रासने यांनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्तपणे लाखमोलाची मदत केली.

रोज दोन वेळा ताजे, सकस जेवण हायजिनिक पद्धतीने तयार करण्याची जबाबदारी महावीर भवन येथील अमित मिलापचंद पटवा यांनी पार पाडली. जेवणाची पाकिटे पोहोच करण्याचे महत्वाचे काम स्वयंसेवक अनिकेत गायकवाड, विजय संतानी, महेश कवळे, किरण खाडे, संतोष बनभेरू यांनी केले.

याशिवाय शहरातील दानशूर मंडळी, व्यापारी, उद्योजक, आनंदधाम फाउंडेशनचे राजकुमार चोपडा, अनिल दुग्गड, प्रविण मुनोत, भास्कर पवार, सुनिल चोरबेले, नितीन शिंगवी, आनंद चोपडा, राजेंद्र गांधी, अभय लुणिया, राहुल सोनीमंडलेचा, निलेश पोखर्णा, चेतन मुथियान, रितेश सोनीमंडलेचा, डॉ.सचिन बोरा, प्रितम गांधी यांनी अथकपणे या उपक्रमासाठी योगदान दिले. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 59 हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करणे शक्य झाले.

आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर सरकारने नित्य व्यवहार सुरु करण्यास अनेक सवलती दिल्या आहेत. असे असले तरी अजूनही अनेकांसमोर घराबाहेर पडल्यावर जेवणाचा प्रश्न असणार आहे. या सर्वांसाठी एक जूनपासून नाममात्र दहा रुपयात जेवण उपलब्ध होणार आहे. यात प्रत्येकाला 3 चपाती, दोन वाटी भाजी, चटणी, ठेचा असे पार्सल देण्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.