उरुळी कांचन – एका खासगी कंपनीत काम करणारे उरुळी कंचन (ता. हवेली) येथील संजय साळवी यांचे मागील महिन्यात अपघातात निधन झाले होते. या संकटामुळे साळवी कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पडला होता. त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यासाठी उरुळी कांचन येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व त्याच अपघातात अपंगत्व आलेल्या त्यांच्या पत्नीची वैद्यकीय जबाबदारी उचलून दातृत्वाचा हात पुढे करण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयाचे उरुळी परिसरात कौतुक होत आहे.
संजय साळवी हे एका खासगी कंपनीत नोकरीस होते. मागील महिन्यात उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात संजय साळवी व त्यांच्या पत्नी रस्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात संजय साळवी यांचे निधन झाले. तर त्यांच्या पत्नीला अपंगत्व आले. त्यांच्या पश्चात आई, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पत्नीपुढे दोन मुलांसह जगावे कसे असा प्रसंग उभा राहीला तर आईने म्हातारपणातील आधार गमावल्याने तिच्या पुढेही संकट निर्माण झाले होते. त्यातून त्यांना सावरण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संजय साळवी यांची दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा अथर्व हा 10 वीत शिकत आहे तर दुसरा मुलगा सुशांत हा 11 वीत शिकत आहे. या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, संजय यांची पत्नीची वैद्यकीय जबाबदारी या कुटुंबाला सर्व शासकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी भाजप पदाधिकाऱ्यांनी उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. 31) सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सुशांत याला शिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व शैक्षणिक साहित्य दिले.
यावेळी भाजपचे विकास जगताप, श्रीकांत कांचन, अजिंक्य कांचन, सारिका लोणारी, शाम गावडे, सुदर्शन चौधरी, अमित कांचन, शरद खेडेकर, शुभम वलटे, ऋषिकेश शेळके, सचिन शेलार, अभिजीत महाडिक, जयेश जाधव, नामदेव महाडिक, कुणाल वनारसे, शेखर टिळेकर, रोहन टिळेकर, स्वप्निल मोरे आदी उपस्थित होते.