सांगवी येथील संतापजनक प्रकार : सांभाळ करणाऱ्या महिलेनेच केला छळ
पिंपरी – नोकरीवर जाण्यासाठी मोठ्या विश्वासाने आपली चिमुकली ज्या महिलेकडे सोपविली तिनेच क्रूरपणे दीड वर्षांच्या चिमुकलीच्या हातावर चटके दिले. हा संतापजनक प्रकार जुनी सांगवी ममतानगर येथे घडला. या प्रकरणी मुलीच्या आईने जनाबाई पवार या महिलेच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मुलींचा सांभाळ करणाऱ्या महिलेने मुलगी त्रास देते या कारणावरुन दीड वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातावर हातांवर चटके दिल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवार (दि.20) दुपारी दीड ते रात्री दहाच्या दरम्यान जुनी सांगवी ममतानगर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई खासगी क्षेत्रात नोकरी करते.
यामुळे, त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्यासाठी घरात जनाबाई पवार या महिलेला कामावर ठेवली होती. आईविना राहत असलेली ती दीड वर्षाची मुलगी त्रास देते, या कारणावरुन जनाबाईने तिच्या दोन्ही हाताला चटके दिले. शनिवारी रात्री मुलीची आई घरी आल्यावर तिला आपल्या मुलीच्या दोन्ही हातांवर चटके दिल्याने जखमा झाल्याचे दिसून आले. त्यावरुन फिर्यादी महिलेने कामवाल्या बाई विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.