एका अनामिकाचे मार्गदर्शन

1993 सालची गोष्ट! जितेंद्र भदाणे बराच वेळ ऐरोलीच्या ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवर बसून होता. गाड्या येत होत्या, जात होत्या. पण हा फक्त बसून होता, सून्न अवस्थेत. काय करावे हे त्याला कळत नव्हते. विचार करून तो थकला होता. लोकलमध्ये बसून कॉलेजला जावे असे त्याला वाटत नव्हते. थोरला भाऊ विजय भदाणे यांच्या घरून जेवणाचा डबा घेऊन, सोबत कॉलेजची वह्या पुस्तके घेऊन तो ठाणे रेल्वे स्टेशनवर आला होता, पण गाडीत बसून वरळीच्या एका कॉलेजमध्ये जावे, असे त्याला मुळी वाटतच नव्हते. कारण वर्गात काय शिकवतात हेच त्याला समजत नव्हते. कॉलेजचे बरेचसे प्राध्यापक परदेशातील होते. त्यांचे उच्चार जितेंद्रला कळत नव्हते. ते नक्‍की काय म्हणताहेत हे तो समजून घ्यायचा प्रयत्न करीत होता; पण तीन महिने झाले तरी त्याला त्यांचे शिकवणे समजत नव्हते.

 

लवकरच सहामाही परीक्षा होईल, पण पेपरात लिहिणार काय? यापूर्वी त्याने बारावीला बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले होते. म्हणजे इंग्रजी विषयाची बऱ्यापैकी जाण होती. पण इथे कोणतेच लेक्‍चर समजत नव्हते. प्राध्यापकांचे इंग्रजीचे उच्चार वेगळे वाटत होते. जितेंद्र ग्रामीण भागात शिकला होता. धुळे जिल्ह्यातील कुरुकवाडी या गावातून तो ऐरोलीला आला होता. थोरला भाऊ विजय भदाणे ऐरोलीत नोकरी करीत होता. त्याचेही अजून लग्न व्हायचे होते. त्याचीही नोकरीची सुरुवात होती. त्याचेही अजून बस्तान बसायचे होते. दोघे भाऊ भाड्याची खोली घेऊन राहात होते. हाताने स्वयंपाक करून खात होते.

जितेंद्रने मुंबईच्या वरळी येथील कॉलेजला टेक्‍सटाइलच्या डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. हा तीन वर्षांचा कोर्स होता. वर्गातील इतर मुले श्रीमंतांची होती. त्यातील बरीचशी मुले उद्योगपतींची होती. त्यांचे घरचे मोठमोठे उद्योग होते. हा डिप्लोमा पूर्ण करून त्यांना कोठे नोकरी करायची नव्हती; तर घरचेच उद्योग पाहायचे होते. ही सर्व मुले इंग्रजी माध्यमातून शिकली होती. बरीचशी मुले कॉन्व्हेंट स्कूलमधील होती. त्यामुळे त्यांना प्राध्यापकांचे शिकवणे समजत होते. ती मुले कॉलेजच्या वातावरणात रुळली होती. ती कॉलेजच्या परिसरात मुक्तपणे वावरत होती. जितेंद्रला मात्र अवघडून गेल्यासारखे वाटत होते.

बरं, हा कोर्स मध्येच सोडून द्यावा, तर दुसरे काय करावे, हा प्रश्‍न होता. थोरला भाऊ विजय भदाणे म्हणाला होता, “”गेलं वर्ष वाया तर जाऊ दे. पुढच्या वर्षी डी.फार्मला प्रवेश घेऊ. एखादं अैषधाचं दुकान गावाकडं सुरू करू. तू चिंता करू नको.”  पण जितेंद्रला वाटे की आता कोर्स मध्येच सोडून दिला तर मित्र हसतील. एक वर्ष आयुष्यातील वाया जाईल. नातेवाईक चेष्टा करतील. बरं गावाकडे जाऊन करणार काय? तेथे राहून काही करावे अशी परिस्थिती नाही. आणि इथे प्राध्यापकांनी शिकवलेलं काही कळत नाही. गावाकडच्या शिक्षकांचे इंग्रजीचे उच्चार आणि येथील शिक्षकांचे इंग्रजीचे उच्चार यात जमीन असमानाचा फरक आहे. अशा कुंठीत अवस्थेत जितेंद्र सापडला होता. पुढे काय करावे हे त्याला सूचत नव्हते. म्हणून गाड्या येत जात होत्या, तरी हा स्टेशनवर फक्त बसून होता.

जितेंद्र बराच वेळ स्टेशनवर बसून आहे हे एका माणसाने हेरले. त्याच्या चेहऱ्यावरून त्या माणसाने तर्क केला की याच्या मनामध्ये प्रचंड कल्लोळ आहे. विचारांची घालमेल आहे. मनावर प्रचंड ताण आहे. तो तणावाखाली दिसतो आहे. म्हणून तो अनामिक माणूस जितेंद्रजवळ आला आणि आपुलकीने म्हणाला,
“”बराच वेळ झाला, आपण इथे बसून आहात. काही अडचण आहे का?”
त्या अनामिकाचे शब्द ऐकून जितेंद्र भानावर आला. त्याने स्वतःला सावरले आणि गडबडीत म्हणाला,
“”नाही, तसं विशेष काही नाही.”
“”खरं सांगा. तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही तणावाखाली दिसताय.”
“”हो. मी अडचणीत आहे. मला प्राध्यापकांनी वर्गात शिकवलेलं अजिबात कळत नाही. त्यामुळे कॉलेजला जावं की जाऊ नये या विचारात मी आहे.”
“”कळत नाही म्हणजे, तुम्हाला विषय समजत नाही की इंग्रजी कळत नाही.”
“”मला त्यांची इंग्रजी भाषा, त्यांचे उच्चार कळत नाहीत.”
“”मग तुम्ही असं करा. दररोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचा. हळूहळू तुमचं इंग्रजी सुधारेल. शिवाय जे शब्द अडतील त्याचे अर्थ शब्दकोशात शोधा. दोन महिन्यात तुमचा आत्मविश्‍वास वाढेल.” त्या अनामिकाच्या बोलण्याने जितेंद्रला धीर आला. घरी आल्यावर त्याने थोरल्या भावाला सर्व हकीगत सांगितली. त्याच्याकडून पैसे घेऊन त्यांनी इंग्रजी डिक्‍शनरी विकत घेतली. मग तो वर्तमानपत्र वाचू लागला. अभ्यासाची पुस्तके वाचू लागला. अवघड वाटणाऱ्या शब्दांखाली रेषा मारून त्यांचे अर्थ शब्दकोशात शोधू लागला. तासन्‌तास तो अभ्यास करू लागला आणि खरोखरच त्याचे इंग्रजी सुधारले. वर्गातील प्राध्यापकांचे अध्यापन समजू लागले. मग तो इतर मुलांच्यात आत्मविश्‍वासाने मिसळू लागला. त्यांच्याशी गप्पा मारू लागला. पुढे तर त्याने एकांकिका बसवली. तो कविता करू लागला. त्या कविता काचेच्या शोकेसमध्ये लावू लागला. पुढे तो चांगल्या गुणांनी पास झाला. त्याची इंग्रजी भाषेविषयीची भीती पार पळाली.

कोर्स पूर्ण होताच त्याला नोकरी मिळाली. पुढे बढती मिळत मिळत तो सेल्स मॅनेजर झाला. नंतर गप्प न बसता त्याने पुण्याच्या कॉलेजमधून बहिःस्थ विद्यार्थी म्हणून एम.बी.ए. पूर्ण केले. नंतर एका नामांकित कंपनीत संचालक झाला. कामानिमित्त त्याने चीन, हॉंगकॉंग, तैवान, दुबईचेही दौरे केले. आज तो एक यशस्वी डायरेक्‍टर आहे. इंग्रजी भाषेची भीती, अध्यापकांची उच्चारपद्धती यामुळे अडलेली त्याची गाडी आता भरधाव वेगाने धावते आहे.

डॉ. दिलीप गरूड

Leave A Reply

Your email address will not be published.