पुणे -इंधनाचे दर आवाक्याबाहेर जात असल्याने सहाजिक सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे, त्यातच प्रदूषण वाढल्याने अन्य समस्यादेखील निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांचा इलेक्ट्रिक वाहन वापराकडे कल वाढला आहे. सरकारदेखील इलेक्ट्रिक वाहनं वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. सध्या, बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध झाल्या आहेत. नावीन्यपूर्ण फीचर्स असलेल्या स्कूटरही लॉंच होत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करताना ही बाब सुखद असताना वाहन उद्योगही इलेक्ट्रिकच्या वळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांबाबत लोकांकडून पसंती दिली जात असतानाच केवळ दुचाकीच नव्हे तर चारचाकी मध्येही अशा वाहनांचा वापर वाढला आहे. शहरातील रस्त्यांवर हिरव्या नंबर प्लेटची संख्या वाढत असल्याचे गर्दीतून सहज लक्षात येते. घरगुती वापरासाठी तसेच व्यावसायिक वाहने म्हणूनही अशा वाहनांचा वापर वाढला आहे. व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या ई-स्कूटरमध्ये स्टोरेज स्पेस आणि तिच्या वहन क्षमतेला प्राधान्य दिले जात आहे. अशा वाहनांचा वापर विविध वस्तुंच्या डिलिव्हरीसाठी केला जात आहे. व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ई-स्कूटरमध्ये फीचर कमी असले तरी त्यांचा वेग अधिक असून यामध्ये स्वदेशी कंपन्या हिरो इलेक्ट्रिक, जितेंद्र ईव्ही यांनी उत्पादित केलेली वाहनेही उपलब्ध असून त्यांना मागणीही चांगली आहे. तसेच, वैयक्तिक वापरासाठीच्या ई-स्कूटर आणि बाइक हाय आणि लो स्पीड फॉरमॅटमध्ये बजाज चेतक, टीव्हीएस या भारतीय कंपन्यांची चलती आहे.
सर्व्हिसिंग स्टेशन वाढविण्याची गरज
पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलक्ट्रिक व्हेईकल सर्व्हिसिंग करण्याची प्रक्रिया तितकीशी सोपी नाही. या सेगमेंटमधील बहुतांश कंपन्या आपल्या इलक्ट्रिक स्कूटरची विक्री ऑनलाइन करतात. तसेच, सर्व्हिसिंग साठी मोबाइल नेटवर्कसारख्या तंत्रावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे सर्व्हिसिंगबाबत अशा कंपन्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
…नंतर वाढणार किमती
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी राज्य सरकार अनेक अनुदान योजना राबवत आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यावर तुम्हाला “फेम-2′ अनुदानाचा लाभ मिळतो. यामुळे स्कूटरच्या किंमतीत फरक पडतो. मात्र, हे अनुदान मार्च 2024 पर्यंत केवळ 10 लाख दुचाकींवर दिले जाणार आहे. “फेम-2′ अनुदान मुदत संपल्यावर इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढणार आहेत.