पणजी- आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वीच उत्तराखंडमध्ये बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. आता केजरीवाल यांनी गोव्यातील सरकारवर हल्लाबोल केला. येथे लाच दिल्याशिवाय सरकारी नोकरी मिळत नसल्याचा दावा करताना त्यांनी गोव्यात मोठी घोषणा केली.
केजरीवाल यांनी म्हटले की, आम आदमी पक्षाचे गोव्यात सरकार बनताच प्रत्येक घरातून एका युवकाला नोकरी देण्यात येईल. गोव्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीत 80 टक्के कोटा आरक्षित करण्यात येईल. तसेच युवकांना नोकरी मिळत नाही, तोपर्यंत दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील.
नोकरी आणि तरुणांव्यतिरिक्त केजरीवाल यांनी पर्यटन आणि खाणींशी संबंधित कुटुंबांना बेरोजगारी भत्ता देण्यासंदर्भात वचन दिले आहे. ते म्हणाले की, गोव्यात अनेक कुटुंब पर्यटन निगडीत व्यवसायातून उदरनिर्वाह करतात. करोनामुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. अशा कुटुंबांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आम आदमी पक्ष प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिन्याला देईल. हीच मदत मायनिंग पुन्हा सुरू होईपर्यंत मायनिंगचे काम करणाऱ्या कुटुंबाला देऊ.
या व्यतिरिक्त दिल्लीच्या धर्तीवर गोव्यात तरुणांसाठी स्कील युनिव्हर्सिटी उभारण्यात येईल. जेणेकरून कौशल्य विकास होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गोव्यामध्ये केजरीवालांची लोकप्रियता वाढल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.