सोन्याचा दर 47 हजारांपर्यंत : दर घटल्याने गुंतवणुकीकडे कल
पिंपरी – सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर पन्नास हजारावरून घसरून आता 47 हजार 400 रुपयांपर्यंत आला आहे. सोन्याचे दर घटल्याने सोन्यातील गुंतवणुकीकडे कल वाढू लागला आहे. गुरूवारी (दि. 25) गुरूपुष्यामृत योग असल्याने त्याचा मुहूर्त साधून सोने खरेदीमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
24 कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅमचे दर जानेवारी महिन्यात 51 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहचले होते. तर, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50 हजारापर्यंत सोन्याचे दर पोहचले होते. दरम्यान, हे दर आता 47 हजारांपर्यत उतरले आहेत. बुधवारी (दि. 24) 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर 47 हजार 400 रुपयांपर्यंत होता. तर, 22 कॅरेटचा दर प्रति दहा ग्रॅमला 45 हजार 700 रुपयांपर्यंत होता.
सध्या सोन्याचे दर कमी झाल्याने गुंतवणुकीसाठी वेढणी आणि कॉईन यांना पसंती मिळत आहे. त्याशिवाय, सोन्याच्या दागिन्यांचीही खरेदी सुरू आहे. सध्या लग्न समारंभासाठी सोन्यातील टेंपल ज्वेलरी, ऍन्टीक व कुंदन ज्वेलरीला मागणी वाढली आहे.
सलग तीन महिन्यात गुरुपुष्यामृत
सोन्याचे दर पुन्हा 50 हजारापर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे सध्या सोन्याचे दर कमी असल्याने गुंतवणुकीसाठी ही चांगली संधी असल्याचे सराफ व्यावसायिकांचे मत आहे. यंदा डिसेंबर-2019, जानेवारी आणि फेब्रुवारी-2020 अशा तीन सलग महिन्यांमध्ये तीन वेळा गुरूपुष्यामृत योग आला आहे. चालू महिन्यात गुरुवारी (दि. 25) गुरूपुष्यामृत योग आहे. त्यामुळे त्याचा मुहूर्त साधून सोन्याची खरेदी वाढू शकते.
चांदी पोहोचली 70 हजारांपर्यंत
चांदीचा दर सध्या प्रति किलो 70 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. चांदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता कमीच आहे. त्याऊलट त्याच्या दरामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. चांदीमध्ये ताट, ताम्हण, तांब्या तसेच गिफ्ट आयटम यांना मागणी आहे. त्याशिवाय, श्री गणेश, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता यांच्या मूर्त्यांची खरेदी केली जात आहे.
सध्या सोन्याचे दर कमी झाल्याने गुंतवणूकीसाठी ही चांगली संधी आहे. कमी बाजारभावाचा फायदा घेऊन नागरिकांनी सोन्यातील गुंतवणूक वाढवायला हवी. सोन्याचे दर पुन्हा 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
– विलास भांबुर्डेकर, भांबुर्डेकर सराफ ऍण्ड ज्वेलर्स, भोसरी.