“महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा”; संजय राऊतांचा रोख नेमका कोणाकडे?

Sanjay Raut Vs Eknath Shinde | खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी एका बकऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत हा बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे असं दिसून येतं आहे. सोबतच ‘खबर पता चली क्या? ए सं शी गट,’ अशा सूचक ओळी त्यांनी पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. या ट्विटबाबत राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
माध्यमांनी राऊत यांना त्या ट्विटचा अर्थ विचारला, असता त्यातील काही माहिती सांगत त्यांनी संकेत दिले. परंतु स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. याचा नेमका अर्थ काय? असे विचारले असता, तुम्हीच अभ्यास करा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“महाराष्ट्रातला एक बकरा आहे तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. त्याला सांगण्यात आलं आहे दिल्लीतून की फार शहाणपणा केलास तर मान उडवेन. गप्प उभं राहायचं आणि बे बे करायचं आहे असं त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलं आहे. ए सं शी गट म्हणजे काय ते तुम्हाला कळलं पाहिजे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत माझ्या ट्वीटचा अर्थ तुम्हाला कळेल. आज अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. मी सध्या बोलणार नाही. मात्र इतकंच सांगू इच्छितो की आता बकरा कापण्याची सगळी तयारी झाली आहे. राज्याच्या राजकारणात काही तरी होत आहे. वेळ आल्यावर मी सांगेनच किंवा त्याआधी तुम्हालाही कळेलच,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. Sanjay Raut Vs Eknath Shinde |
खबर पता चली क्या?
ए सं शी गट …. pic.twitter.com/PkELeRQBEf— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2025
अमित शाह यांच्या दौऱ्यावर राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अमित शाह यांची भेट घेतली. त्याबाबत राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे अमित शाह हे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जन्म देण्याचे काम अमित शाह यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना शाह यांना भेटावे लागणार आहे. त्यामुळे पुण्यात जाऊन त्यांनी चर्चा केली असणार, असे राऊत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा उल्लेख ए सं शी
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गट म्हणजे ए सं शी आहे असं म्हटलं आहे. सातत्याने ए सं शी असाच उल्लेख ते करत आहेत. त्या प्रमाणेच आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख एसंशी असा केला आहे.
हेही वाचा:





