शहराचा विकास ठप्प झाल्याने एक पिढी बरबाद : आ. जगताप

नगर  – आमदारकीची माझी 5 वर्षाची कारकिर्द जनतेसमोर आहे. त्यापूर्वीच्या 25 वर्षाच्या काळात नगरचा विकास ठप्प झाला होता. त्यामुळे एक पिढी बरबाद झाली आहे. या विकासाला चालना देण्याचे काम गेल्या 5 वर्षात केले. रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आय.टी.पार्क सुरु केले, रस्त्यांची कामे मार्गी लावल्याचे आमदार संग्राम जगताप म्हणाले.

आ. जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शहर कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यावेळी आ.जगताप बोलत होते. यावेळी पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष फिरोज खान, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष दिलीप सकट, अभिजित कांबळे, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

आ.जगताप म्हणाले, जे 25 वर्ष आमदार आणि काहीकाळ मंत्री होते. त्यांनी या मोठ्या काळात विकासाकडे दुर्लक्ष करुन केवळ भावनेचे राजकारण केले. या काळात एक पिढी बरबाद झाली. रोजगार नाही, विकास ठप्प ही बाब विचारत घेऊनच गेल्या 5 वर्षात काम सुरु केले. भिंगारचा मुख्य रस्त्याचा मोठा प्रश्‍न सोडविला तसेच नगर, भिंगार, परिसरातील ग्रामीण मनपा हद्दीतील भाग, बुरुडगाव ग्रा.पं. अशा प्रत्येक ठिकाणी आपण कामे केली आहे.

वारुळाचा मारुती ते निंबळक रस्त्याचे काम सुरु आहे. महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. विडी उद्योगावर संक्रांत आहे. त्याआणि अन्य महिलांना घरबसल्या काम देण्याची योजना हाती घेतली आहे, असे ही आ.जगताप म्हणाले. भुजबळ यांनी प्रास्ताविकात पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात, युवानेते सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार शहर कॉंग्रेस आघाडी धर्म पाळणार आहोत, असे स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.