सातारा : उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोर्या करणारी तिघांची टोळी कराड, सातारा,पाटण या तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली.
खंडू प्रल्हाद जाधव (टोळी सदस्य), विशाल लक्ष्मण कुकले (टोळी प्रमुख), विशाल बळीराम माने (सर्व रा. उंब्रज, ता कराड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या तिघांविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात जबरी चोरी व मारामारीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. वारंवार त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्यामुळे उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी या तिघांच्या टोळीला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावावर सुनावणी होऊन या टोळीला एक वर्षासाठी सातारा , कराड व पाटण तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अशाप्रकारे गुन्हेगारी करणार्यांना तडीपारी व इतर कारवायांना सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस दलाकडून देण्यात आला आहे.