गुन्हे शाखेच्या युनिट चार पथकाकडून पाच जणांना अटक
पिंपरी – हिंजवडी परिसरातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या टोळीतील काही आरोपींवर मारामारी आणि स्त्री अत्याचाराचे गुन्हे ही दाखल आहेत.
सागर कुमार हवाळे (वय 19, रा. लोणी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), करण तानाजी वायकर (रा. पिंपरी (पा), पोस्ट, साकत, ता. परांडा), तुषार भारत शिंदे (रा. लोणी ता. परंडा), राहुल म्हसू शिंदे (रा. लोणी ता. परांडा), गोकुळ धोंडीराम पवार (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे. मूळ रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी फेज दोन येथील बोडकेवाडी येथून 9 जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती. गुन्हे शाखेचे पोलीस नाईक वासुदेव मुंडे, पोलीस शिपाई धनाजी शिंदे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात चोरीसाठी वापरलेल्या मोटारसायकलची माहिती मिळाली. ही मोटारसायकल उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील लोणी येथील सागर कुमार हवाळे याच्या नावावर असल्याचे समजले. पोलिसांनी हाच धागात पकडत सर्व आरोपींना पकडले. आरोपींनी ट्रॅक्टर फुरसुंगी येथील गोकुळ पवार याला विकला होता.