बनावट बांधकाम परवान्याच्या आधारे बांधली चार मजली इमारत

पिंपरी  –  बांधकाम परवाना विभागाची परवानगी न घेता खोट्या परवानाद्वारे चार मजली इमारत बांधली. त्यानंतर एका सदनिकाधारकाची सदनिका त्याच्या परस्पर विकली. तसेच त्या सदनिकेवर फायनान्स कंपनीकडून 14 लाख 55 हजारांचे कर्ज घेतले. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला.

प्रशांत सुरेश शिरसाट (रा. काटेपूरम चौक, पिंपळे गुरव), आशुतोष सुनील नितनवरे (रा. पिंपळे गुरव), दीपक कडूबाळ गायकवाड (रा. पिंपळे गुरव), ज्ञानेश्वर जगदीश पाटील, आणि एक महिला (दोघे रा. दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिल मारुती भालेराव (वय 56, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सन 2012 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत घडली.

आरोपींनी पिंपळे गुरव मधील जवळकरनगर येथे लेन नंबर एकमध्ये कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना न घेता खोट्या परवानाद्वारे चार मजली इमारत बांधली. तसेच ज्ञानेश्वर पाटील याच्यासोबत संगनमत करून आरोपींनी फिर्यादी यांच्या मालकीच्या एका सदनिकेची विक्री केली. विक्री केलेल्या सदनिकेवर आरोपी ज्ञानेश्वर पाटील आणि महिला आरोपी यांनी अस्पायर होम फायनान्स, फुगेवाडी या फायनान्स कंपनीकडून 14 लाख 55 हजार 344 रुपयांचे कर्ज घेतले. त्याचेही हप्ते आरोपींनी भरले नाहीत, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.