#INDvENG : भारताचा 5-3-2-1 चा फार्म्युला

चेन्नई – भारत व इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यापासून चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील पहिली लढत चेन्नईत पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल. भारतीय संघाचे पारडे जड मानले जाते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. अशीच कामगिरी भारत पुन्हा करण्यास उत्सुक आहे. ही मालिका मायदेशात होत असल्याने भारतीय संघ 5-3-2-1 चा फॉर्म्युला वापरणार आहे. पाच परिपूर्ण फलंदाज, तीन फिरकी गोलंदाज, दोन वेगवान गोलंदाज व एक अष्टपैलू खेळाडू असा भारतीय संघ खेळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

परदेशात मालिका विजय मिळवणारा भारतीय संघ मायदेशात देखील विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल यासाठीच संघात अव्वल फिरकीपटूंना स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. गेल्या वेळी म्हणजेच 2016 साली जेव्हा इंग्लंड भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा रवीचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा यांनी मिळून इंग्लंडच्या 93 पैकी 54 विकेट घेतल्या होत्या आणि भारताने पाच सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकली होती.

या मालिकेत दुखापतीमुळे रविंद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल यापैकी एकाला अश्विन सोबत संघात स्थान दिले जाऊ शकते. सुंदरने फलंदाजीतही चमक दाखवल्यामुळे त्याच्या समावेशाची शक्‍यता जास्त आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. यात सुंदरसह तीन फिरकीपटू असू शकतात. कुलदीप यादवला देखील संधी मिळू शकते. त्याने नेटमध्ये खुप सराव केला आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली नव्हती.कुलदीपने गेल्या दोन वर्षात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीत अ संघाविरुद्धच्या सामन्यात 16 ओव्हरमध्ये त्याने एकही विकेट घेतली नव्हती. त्यामुळेच कुलदीपच्या जागी सुंदरला संधी मिळण्याची शक्‍यता अधिक आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली कामगिरी केली होती. चेन्नई हे सुंदर आणि अश्विनचे घरचे मैदान आहे. याचा फायदा घेण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.