संगमनेर (शहर प्रतिनिधी) – आसमंतात प्रकाशाची विविध रंगी उधळण करणारा, आकर्षक रांगोळी व रुचकर फराळाचा आनंद द्विगुणित करणारा दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव म्हणजे दीपोत्सव. अशा या आनंदमय उत्सवाच्या प्रसंगी संगमनेरमधील आधार फाउंडेशनने एक करंजी-एक लाडू उपक्रम राबवत वंचित व उपेक्षितांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविला.
आधार फाउंडेशनचे सर्व शिलेदार दिवाळीच्या पूर्वसंध्येला राजापूरमधील मजूर वस्ती परिसरात दाखल झाले. नूतन माध्यमिक विद्यालयाच्या मागील बाजूस नांदेड हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यात झारखंड बंगाल मध्यप्रदेश व कर्नाटक आदी राज्यातून आलेल्या मजुरांच्या परिवारासोबत आधारने घराघरात करंजी, लाडू, शेव, चिवडा, अनारसे, शंकरपाळे अशी मिठाई वाटप करत प्रत्येक कुटुंबात एक साडी भेट दिली.
यावेळी किसन हासे, माजी पंचायत समिती सदस्य माधव हासे, नूतन माध्यमिक व ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत आधार फाउंडेशनला दरवर्षी सामाजिक दिवाळी साजरी करत असल्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी संगमनेर कारखान्याचे संचालक संतोष हासे, संजय हासे, प्रागतिक संस्थेचे अध्यक्ष अनिल गोडसे, सरपंच बादशहा हासे, उपसरपंच सचिन हासे, प्रभारी प्राचार्य श्रीधर घोडेकर, रावसाहेब खतोडे, जिजाबा हासे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर, मेजर लक्ष्मण ढोले, उपप्राचार्य किसन दिघे आदी उपस्थित होते.
सामाजिक दिवाळीनिमित्त आधारच्या वतीने श्रीनगर येथे सेनादलात सेवा करणारे सैनिक संतोष ठोंबरे यांचा सन्मान करण्यात आला. आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कुरण परिसरातील गारमळा येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीवरही दिवाळी साजरी करण्यात आली.शाळा व्यवस्थापन अध्यक्ष लक्ष्मणराव दये, लक्ष्मण कोते अक्षरभारतीचे अध्यक्ष भानुदास आभाळे, शंकर ठोंबरे यांनी फराळ वाटप केले. प्रास्ताविक पी. डी. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी तर आभार सुखदेव इल्हे यांनी मानले.
समाजातील उपेक्षितांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा. यासाठी संगमनेरमधील आधार फाउंडेशन अतिशय अनमोल काम करत आहे. वाडी- वस्तीवरील मुले शिकली पाहिजे. संगणक साक्षर झाली पाहिजे. यासाठी अक्षरभारतीचा संगणक शिक्षण उपक्रम कायम चालू राहील, तसेच गारमळा वस्तीवरील पंचवीस मुलांच्या संगणक शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
भानुदास आभाळे
अक्षरभारतीचे अध्यक्ष