नॅशविला (अमेरिका) – सोमवारी नॅशविला येथील शाळेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणामुळे खासगी शाळांमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नॅशविला येथील शाळेतील माजी विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या बेछुट गोळीबारामध्ये 3 विद्यार्थी आणि 3 प्रौढ व्यक्ती ठार झाल्या. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये हल्लेखोर ठार झाला.
या पोलीस कारवाईचे थेट पोलिसांच्या खांद्यावर बसवलेल्या कॅमेऱ्यातील शूटिंग बुधवारी वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले. तेंव्हा शाळेतील सुरक्षा व्यवस्था चांगली होती, असे दिसून आले. तरीही खासगी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेच आहे.
शाळेमध्ये काचेची तावदाने असलेल्या दरवाज्यांना दुहेरी लॉक सिस्टीम होती. याशिवाय आतून आणि बाहेरूनदेखील लॉक लावली जातील अशी यंत्रणाही होती. मात्र हल्लेखोर युवक ओआर-17 रायफल घेऊन शाळेत घुसला होता.
या रायफलीच्या गोळीबारात या काचेच्या दरवाज्यांचा टिकाव लागणे शक्यच नव्हते, असे नॅशलिला प्रीसबायटरी शाळेशी संबंधित जॉर्ज ग्रॅन्ट यांनी सांगितले. सार्वजनिक शाळांमधील सुरक्षा व्यवस्था खासगी शाळांमध्ये असत नाहीत, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
टेनेसी कायद्यानुसार सुरक्षा योजना विकसित करण्याची गरज खासगी शाळांना लागू होत नाही, असे शालेय शिक्षण विभागाने ईमेल द्वारे दिलेल्या स्पष्टिकरणामध्ये म्हटले आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठीच्या सरकारी कार्यक्रमांमध्येही खासगी शाळा फार सहभागी होत नाहीत.
राष्ट्रीय पातळीवरून काही निधी उपलब्ध करून दिला जातो. सर्वसाधारणपणे सार्वजनिक शाळांप्रमाणे खासगी शाळा थेट पोलिसांची मदत घेत नाहीत, असे “नॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल रिसोर्सेस ऑफिसर्स’च्या कार्यकारी संचालक मो कॅनडी यांनी सांगितले.
तरीही, सामूहिक गोळीबाराच्या व्यापक घटनांच्या पार्श्वभुमीवर खाजगी शाळांनी हिंसा प्रतिबंधात सार्वजनिक शाळांप्रमाणेच गुंतवणूक केली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.