नवी दिल्ली – दिल्लीतील एम्स संस्थेच्या रुग्णालयातील एका विभागात आज आग लागली. एम्सच्या अतिदक्षता विभागाच्या शेजारच्याच खोलीत ही आग लागल्याने मोठा धोका निर्माण झाला होता, पण सुदैवाने ती आग जादा पसरली नाही.
पहाटे पाचच्या सुमाराला हा प्रकार घडला. अग्निशमन दलाच्या सात बंबांनी ती आग आटोक्यात आणली. त्यांनी प्रथम अतिदक्षता विभागातील सर्व रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर आग आटोक्यात आणली गेली. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही जखमी झाले नाही.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, काही काळानंतर रुग्णालयाचे नियमित कामकाज सुरू करण्यात आले त्यात फार खंड पडला नाही. आगीच्या कारणांचा सध्या शोध घेतला जात आहे.