#COVID19 : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

दिल्लीत मास्क न घातल्यास 2 हजार रुपये दंड

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या हाता बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाने 131 रूग्णांचा बळी घेतला ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कोरोनामुळे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारने कठोर पावलं उचलली असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

केजरीवाल म्हणाले की, आता राजधानी दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना 2 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्कम 500 रुपये होती. उपराज्यपाल यांची भेट घेऊन आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यापूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता, परंतु बरेच लोक मास्क वापरत नसल्याचे आढळून आले, त्यामुळेच आम्ही दंडाची रक्कम दोन हजार रुपयांपर्यंत वाढवित आहोत, असे त्यांनी सांगितले.

छठ पूजेबाबत आवाहन..

पुढे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आम्हाला वाटतं की, लोकांनी छठ पूजा उत्सव धूमधाममध्ये साजरा करावा पण सार्वजनिक ठिकाणी नाही. अनेक राज्यात यंदा छठपूजेवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांना आमचं आवाहन आहे की, त्यांनी यंदा हा उत्सव घरीच व साधेपणाने साजरा करावा.

खाजगी रूग्णलयात कोरोना रूग्णांसाठी 80 टक्के बेड आरक्षित..

सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड कोरोना रूग्णासाठी आरक्षित असणार आहेत. सर्व प्रकारच्या नाॅन-क्रिटिकल नियोजित शस्त्रक्रिया टाळण्याच्या सूचना देखील सरकारने खाजगी रूग्णालयास दिल्या आहेत. तसेच दिल्ली सरकारकडून 663 तर केंद्र सरकारकडून 750 असे एकूण 1400 पेक्षा अधिक आयसीयू बेडची व्यवस्था देखील करण्यात येत आहे, अशी देखील माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.