लंडन, (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये कोविड-19 शी संबंधित नियमांचा भंग करणाऱ्यावर जबर दंड आकारला जाणार आहे. कोविड-19 चा प्रसार टाळण्यासाठी स्वतःला विलगीकरणामध्ये ठेवण्यास विरोध करणाऱ्या व्यक्तीला इंग्लंडमध्ये आता 10 हजार पौंडांचा दंड भरावा लागणार आहे.
हे नियम 28 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. चाचणी केल्यानंतर करोनाची लागण झालेली असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तीला विलगीकरणामध्ये राहणे अपेक्षित आहे. मात्र त्या रुग्णाने विलगीकरणात राहण्यास नकार दिल्यास हा दंड आकारला जाणार आहे.
करोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींना जबर दंड आकारला जाईल, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पहिल्यांदा नियमभंग केल्याबद्दल आकारण्यात येणारा दंड 1 हजार पौंड इतका असेल. त्यानंतर पुन्हा नियमभंग करणाऱ्यांसाठी हा दंड 10 हजार पौंडांपर्यंत वाढवला जाईल.
याशिवाय जे कर्मचारी विलगीकरणामध्ये राहतील त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी देऊन कामावर रूजू होण्यास भाग पाडले जाईल, त्या मालकांवरही हा दंड लागू केला जाईल. अल्पउत्पन्न गटातील कामगार आणि ज्यांचा रोजगार बुडाला आहे, अशांना दरमहा 500 पौंडांची मदतही देण्याची घोषणा जॉन्सन यांनी केली आहे. इंग्लंडमध्ये सध्या कोविड-19 च्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची स्थिती दिसत आहे.