कारेगावात दोन गटात तलवारीने हाणामारी

पाथर्डी – कारेगाव येथे दोन गटात झालेल्या तुफान मारामारीत दोघेजण गंभीर जखमी झाले. दोन्ही गटाकडून तलवारीने मारहाण झाल्याने परस्पर विरोधी तक्रारी दाखल आहेत. गंभीर जखमी करणे व खुनाचा प्रयत्न करणे, हत्यार बाळगण्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. शनिवारी घडलेल्या घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून 8 मेपर्यंत दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी दिले.

शनिवारी सायंकाळी चार वाजता विष्णु भाबड, भगवान भाबड, देवीदास भाबड, प्रशांत भाबड, ऋषीकेश दहीफळे, गणेश दहीफळे, गेणा भाबड, जिजाबाई भाबड, सुनिता भाबड, सविता भाबड यांनी कानिफनाथ दहीफळे व भरत दहीफळे यांना पूर्वीच्या भांडणाच्या राग मनात धरुन तलवार, कोयता व दगडाने मारहाण केली. कानिफनाथ दहीफळे यांच्या डोक्‍याला तलवारीचा मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस उपनिरीक्षक एम. ए. कचरे तपास करीत आहेत.

शनिवारी सायंकाळी पाच वाजता भाबड आणि दहीफळे कुटुंबात हा वाद झाला. देवीदास लक्ष्मण भाबड यांनी दिलेल्या फिर्यादीत मागील भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीच्या घरासमोर केशव दहीफळे, कानिफ दहीफळे, बाळासाहेब दहीफळे आणि भरत दहीफळे यांनी तलवार, लोखंडी दांडके व लाकडी दांडक्‍याने देवीदास भाबड व गेणा तुकाराम भाबड यांना मारहाण केली. गेणा भाबड यांच्या डोक्‍याला तलवार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत अशी फिर्याद नोंदविली.

पोलिसांनी या प्रकरणी केशव दहीफळे व भरत दहीफळे यांना रविवारी अटक केली आहे. दोघांना पाथर्डीच्या न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांच्यासमोर पोलिसांनी हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिस नाईक सोमीनाथ बांगर तपास करीत आहेत. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना तलवारीने व लोखंडी गज, काठ्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याने ही दुश्‍मनी नेमकी कशाची असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.