वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापाठोपाठ व्हाईट हाऊसमधील आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमधील दोन सदस्य, ट्रम्प यांचे पूर्वीचे सल्लागार, त्यांचे प्रचार व्यवस्थापक आणि व्हाईट हाऊसमधील तीन पत्रकारांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टनचे उपनगर असलेल्या बेथेस्डा येथील वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर मेलनिया यांच्यावर व्हाईट हाऊसमध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नॉर्थ कॅरोलिनातील सिनेटर थॉम टिलीस आणि उटाह येथील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर माईक ली यांनाही करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त व्हाईट हाऊसमधील काही पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही अलिकडच्या काळात कोविड-19 ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन आणि उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या प्रसिद्धी प्रमुख केटी मिलर यांचाही समवेश आहे.
याशिवाय ट्रम्प आणि मेलनिया यांच्या जवळच्या सहकारी होप हिक्स, व्हाईट हाऊसच्या माजी सल्लागार केलेनी कॉनवॉय, ट्रम्प यांचे प्रचार प्रमुख बिल स्टीफन यांचीही कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सर्वजण अलीकडच्या काळात ट्रम्प यांच्या बरोबर काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
तर व्हाईट हाऊसमधील तीन पत्रकारांनाही कोविड-19 ची लागण झाली असल्याचे व्हाईट हाऊस पत्रकारांच्या संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.